(फुणगूस / एजाज पटेल)
राज्य सरकार एकीकडे “ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश दिला जात असताना फुणगूस खाडीभागातील फुणगूस, कोंडये, डावखोल, मांजरे तसेच डिंगणी, पिरंदवणे परिसरात मात्र सर्रास वृक्षतोड करून निसर्गाचा ऱ्हास केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कुऱ्हाडीचे घाव घालून उभी झाडे आडवी केली जात असून संपूर्ण खाडीभाग आता उजाड आणि बोडका दिसू लागला आहे.
या परिसरात जणू वीरप्पनचे टोळकेच घुसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांमध्ये घुसून येथील भोळ्या-भाबड्या ग्रामस्थांचा गैरफायदा घेतला जात आहे. आंबा, फणस, ऐन, किंजल, साग यांसारखी मौल्यवान झाडे अत्यल्प दरात विकत घेऊन कोणतीही परवानगी न घेता किंवा दहा–पंधरा झाडांचा परवाना घेऊन तब्बल पन्नास–साठ झाडांची तोड केली जात आहे.
दिवसा-ढवळ्या तोड आणि वाहतूक, कायद्याला खुले आव्हान
धक्कादायक बाब म्हणजे ही वृक्षतोड आणि लाकूड वाहतूक दिवसा उजेडी सुरू आहे. फुणगूस–जाकादेवी, डिंगणी–शास्त्री पूल आंबेड तसेच करजुवे मार्गे सर्रास लाकूड वाहतूक केली जात असून यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष की संगनमत?
देवरुख येथे तालुका वनविभाग कार्यालय अस्तित्वात असताना आणि फुणगूस खाडीभागासाठी स्वतंत्र वनरक्षक नेमलेला असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड कशी काय होत आहे, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.“राजरोस सुरु असलेली वृक्ष तोड आणि वाहतूक दिसत नाही का, की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे?” असा थेट संशय वनविभागाच्या कार्यप्रणालीवर व्यक्त केला जात आहे.
हिरवाईचा संहार, पर्यावरण धोक्यात
एकेकाळी हिरवाईने नटलेला हा खाडीभाग आज ओसाड होत चालला असून याचा परिणाम जैवविविधता, पाणीपातळी आणि स्थानिक हवामानावर होणार आहे. तरीही प्रशासन आणि वनविभाग गप्प का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
कठोर कारवाईची मागणी
बेकायदेशीर वृक्षतोड करणारे दलाल, वाहतूकदार तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

