(नवी दिल्ली /वृत्तसंस्था)
देशाची राजधानी नवी दिल्ली ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेतून राज्याची सांस्कृतिक परंपरा आणि आर्थिक ताकद जगासमोर मांडणार आहे.
संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या तयारीची अधिकृत माहिती दिली. यंदाच्या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैभव कर्तव्यपथावर सादर होणार आहे.
यंदाच्या संचलनात एकूण ३० चित्ररथ सहभागी होणार असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सामाजिक चळवळीने आज ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्यात कसा मोलाचा वाटा उचलला आहे, याचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवले जाणार आहे. गणेशोत्सवामुळे होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार आणि स्थानिक व्यावसायिकांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार झालेली व्यापक आर्थिक साखळी याचे सजीव चित्रण यात करण्यात आले आहे. ढोल-ताशा पथकांच्या सादरीकरणातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेशही देण्यात येणार आहे.
लष्करी संचलनात यंदा प्रथमच ‘बॅटल ॲरे’ ही युद्ध रचना सादर केली जाणार आहे. यामध्ये अर्जुन टँक, टी-९० भीष्म रणगाडे, राफेल लढाऊ विमाने आणि स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रप्रणाली देशवासियांना पाहायला मिळणार आहे. संचलनात १८ लष्करी तुकड्या, १३ बँड्स आणि ३० चित्ररथ सहभागी होतील.
या सोहळ्यात २,५०० कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा प्रभावी निवेदन आवाज लाभणार आहे. ‘जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ, लखपती दीदी आणि प्रगत शेतकरी यांच्यासह १०,००० विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी ‘राष्ट्रपर्व’ हे विशेष पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. तसेच २६ ते ३१ जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात येणार असून, तेथेही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव देशभरातील नागरिकांना घेता येणार आहे.

