(मुंबई)
सौर कृषिपंपांच्या उभारणीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आघाडी घेत ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत राज्यात १० लाख सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले असून, देशातील सर्वाधिक सौर कृषिपंपांचा मान महाराष्ट्राने पटकावला आहे. मुख्यमंत्र्यांनी या अभिमानास्पद यशाबद्दल ऊर्जा विभाग, महावितरण आणि राज्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
महावितरणमार्फत प्रधानमंत्री कुसुम-बी आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली राज्याने सौर कृषिपंप उभारणीत देशात मोठी आघाडी घेतली आहे.
देशभरात आतापर्यंत एकूण १५ लाख ६२ हजार २८९ सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून, त्यापैकी तब्बल १० लाख ४७२ सौर कृषिपंप महाराष्ट्रात आहेत. म्हणजेच देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी सुमारे ६४ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रानंतर हरियाणा येथे १ लाख ९० हजार, राजस्थानमध्ये १ लाख २७ हजार, उत्तरप्रदेशात ७१ हजार ५३८, झारखंडमध्ये ६१ हजार ४५२ आणि गुजरातमध्ये २१ हजार ८९४ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
याआधीही महाराष्ट्राने डिसेंबर २०२५ मध्ये एकाच महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करून विश्वविक्रम केला होता. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेअंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ १० टक्के तर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना फक्त ५ टक्के लाभार्थी हिस्स्यावर ३, ५ आणि ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप उपलब्ध करून दिले जात आहेत.
सौर पॅनेल्समधून तब्बल २५ वर्षे वीज निर्मिती होत असल्यामुळे राज्यातील १० लाखांहून अधिक शेतकरी वीजबिलांपासून मुक्त झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळत असून, विद्युत अपघातांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
सौर पॅनेल्सच्या मदतीने सिंचनासोबतच घरगुती उपकरणे चालविणे, मोबाईल आणि ई-वाहने चार्ज करणेही शक्य झाले आहे. तसेच अतिरिक्त विजेच्या वापरातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक सौर कृषिपंपाला ५ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर राहणार असून, नैसर्गिक आपत्ती, चोरी किंवा नुकसानाविरोधात विमा संरक्षणाची सुविधाही देण्यात आली आहे.
सौर कृषिपंपासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी महावितरणचे मोबाईल अॅप, वेबसाईट, २४ तास सुरू असलेली टोल-फ्री सेवा तसेच संबंधित पुरवठादार कंपन्यांच्या संकेतस्थळांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

