(चिपळूण / प्रतिनिधी)
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत सोशल मीडियावरून पसरवली जाणारी अपुरी व दिशाभूल करणारी माहिती हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका करत, “अशा रसायन कंपन्यांमध्ये भागीदार होण्याइतका मी चिंधीचोर नाही,” असे ठामपणे सुनावले.
चिपळुणातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत वस्तुस्थिती जाणून न घेता सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “सातवीत शिकणारा मुलगाही ऐकलेल्या माहितीमध्ये थोडी भर घालून पुढे पाठवत आहे. काहींनी तर माझी या कंपनीत भागीदारी असल्याचा जावईशोध लावला,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने अद्याप व्यावसायिक उत्पादन सुरू केलेले नाही. सध्या केवळ चाचण्या सुरू असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला दिली आहे. “हा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी सांगितले. या कंपनीत तयार होणारे पीएफएएस (पर आणि पॉलिफ्ल्युरोआल्किल) हे रसायन इटलीमध्ये प्रतिबंधित असले, तरी भारतात ‘उदयोन्मुख प्रदूषक’ या वर्गवारीत काही अटींवर परवानगी दिली जाते. देशातील इतर ठिकाणीही याआधी अशा उत्पादनांना मंजुरी देण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. याच आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
“कंपनीने आजतागायत शून्य टक्केही उत्पादन घेतलेले नाही. केवळ चाचण्यांमधून निर्माण झालेला टाकाऊ माल तळोजा येथे जाळण्यासाठी पाठवण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. ४ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिली असून, चाचण्यांचा अहवाल सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
हा अहवाल आल्यानंतर तज्ज्ञांकडून त्याचा अभ्यास केला जाईल. “जर अहवाल सकारात्मक असला, तरीही हे उत्पादन प्रदूषणकारी आहे, कोकणच्या निसर्गाला धोका पोहोचू शकतो, असा निष्कर्ष निघाला, तर शासन म्हणून आम्ही या उत्पादनावर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असा ठाम इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. कंपनीच्या उत्पादनाबाबत तथ्य न तपासता पसरवलेल्या अफवांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा कंपन्यांमध्ये भागीदारी करण्याइतका मी चिंधीचोर नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगून चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

