(चिपळूण)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदके पटकावत महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
महाविद्यालयातील कु. साक्षी सुभाष थोरात हिने बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमात विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयांमधून सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला मानाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्द आणि परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
तसेच २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील कु. समीक्षा सुरेश बोने हिने कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्कृष्ट यश संपादन करत सुवर्णपदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद यांचेही विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
“ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक मिळवतात, तेव्हा संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब होते,” असे मत व्यक्त करत संस्थेच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल साक्षी थोरात आणि समीक्षा बोने यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फोटो : सुवर्णपदक पुरस्कार प्रदान करताना श्री. सुरेश प्रभू (माजी केंद्रीय मंत्री,भारत सरकार), पुरस्कार स्वीकारताना कु. साक्षी थोरात, डॉ. संजय भावे (कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली.)

