( चिपळूण )
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, ७ जानेवारीला सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे उपस्थित होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आदी उपस्थित होते.
या दीक्षांत समारंभात दरवर्षी विज्ञान क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षी चिपळूण तालुक्यातील चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी करंदीकर हिने एमएस्सी पदवी प्राप्त केली आहे. तिने विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे आणि त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या दीक्षान्त समारंभात केली. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षान्त समारोह आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल. महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, याकडे लक्ष वेधून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे ,असे राज्यपालांनी सांगितले. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.