(मुंबई / वृत्तसंस्था)
भारतातील क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने कॉर्डेलिया क्रूझने आपल्या ताफ्यात ‘कॉर्डेलिया स्काय’ या नव्या आलिशान क्रूझचा समावेश केला आहे. या जहाजाची व्यावसायिक सेवा उद्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीच्या ताफ्यात आता ‘एमव्ही एम्प्रेस’ आणि ‘कॉर्डेलिया स्काय’ ही प्रमुख जहाजे आहेत. मुंबई, गोवा, कोची, लक्षद्वीप आणि चेन्नई या भारतीय किनारपट्ट्यांसह श्रीलंका आणि मालदीवसारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या मार्गांवर ही क्रूझ सेवा चालवली जाणार आहे. या माध्यमातून क्रूझ पर्यटनाचा विस्तार होण्यासोबतच रोजगारनिर्मिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
‘कॉर्डेलिया स्काय’च्या नियोजित प्रवासामध्ये विविध कालावधींच्या पर्यटन पॅकेज चा समावेश आहे. मुंबई ते गोवा या मार्गावर दोन रात्रींचे वीकेंड आणि अल्पकालीन सहलींचे पर्याय उपलब्ध असतील. या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती अंदाजे २५ हजार ते ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावरील पाच रात्रींच्या सहलीत बेटांचे सौंदर्य, प्रवाळ आणि समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येणार असून, या पॅकेजची प्रतिव्यक्ती अंदाजे किंमत ७५ हजार ते १.२५ लाख रुपये असेल. चेन्नई आणि पूर्व किनारपट्टीच्या मार्गावर चेन्नई ते विशाखापट्टणम तसेच श्रीलंकेतील ट्रिंकोमली आणि जाफना या ठिकाणांचा समावेश असलेल्या सफरींचे नियोजन आहे.
प्रवाशांच्या निवासासाठी क्रूझवर इंटिरियर स्टेटरुम, ओशन व्ह्यू रूम, बाल्कनी केबिन आणि लक्झरी सुइट्स असे पर्याय उपलब्ध असतील. खाद्यपदार्थांमध्ये विविध पाककृतींसह जैन शाकाहारी भोजन, कॉन्टिनेंटल, ओरिएंटल आणि भारतीय स्ट्रीट फूडचा समावेश असेल. मनोरंजनासाठी ब्रॉडवे शैलीतील कार्यक्रम, लाइव्ह म्युझिक, डीजे नाइट, कॅसिनो, स्विमिंग पूल, जिम आणि स्पा अशा सुविधा देण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र प्लेझोन आणि किड्स क्लबची व्यवस्थाही असेल.
क्रूझ पर्यटनाचा फायदा केवळ प्रवाशांपुरता मर्यादित राहत नसून, त्यातून विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे कॉर्डेलिया क्रूझचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) निशिकांत उपाध्याय यांनी सांगितले. ते म्हणाले, “क्रूझ पर्यटन देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देते. यामुळे बंदरांचा विकास होतो, पर्यटन वाढतं, स्थानिक हस्तकला आणि सेवा क्षेत्राला रोजगार मिळतो आणि कोट्यवधी रुपयांची विदेशी चलनप्राप्ती होते.”
क्रूझ पर्यटनाच्या वाढीमुळे किनारपट्टीवरील हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सी, पर्यटक मार्गदर्शक आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात, असे उपाध्याय यांनी नमूद केले. पर्यटकांकडून होणाऱ्या खरेदीमुळे स्थानिक कारागीर, विक्रेते आणि टॅक्सीचालकांच्या उत्पन्नातही वाढ होते. त्याचबरोबर क्रूझ टर्मिनल्सचे आधुनिकीकरण झाल्याने बंदरांची क्षमता वाढते आणि सागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतात. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या खर्चातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळण्याची संधीही उपलब्ध होते.
केंद्र सरकारकडून ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासह क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर क्रूझ पर्यटनाचा विस्तार झाल्यास या क्षेत्रात रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. ‘कॉर्डेलिया स्काय’च्या समावेशामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनासाठी उपलब्ध पर्यायांमध्ये भर पडणार आहे.


