(राजापूर)
राजापूर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत चार दुचाकी आणि एक मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ डिसेंबरच्या सायंकाळपासून २० डिसेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजापूर शहर आणि ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शिवणे बुद्रुक येथील रहिवासी व शिक्षक वैभव देवू करंबे यांनी आपली ‘पॅशन प्रो’ दुचाकी (एमएच ०८ एएच ५४६४) घराशेजारील शेडमध्ये उभी केली होती. २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कामावर जाण्यासाठी बाहेर पडताना त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच, करंबे यांच्यासह तालुक्यातील आणखी तीन ठिकाणांहून दुचाकी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
चोरट्यांनी पॅशन प्रो (एमएच ०८ एएच ५४६४), स्प्लेंडर (एमएच ०८ एव्ही ०९३५), बजाज सीटी १०० (एमएच ०४ सीआर ४१८७) आणि ड्रिम युगा होंडा (एमएच ०८ एसी १५७६) अशा चार दुचाकींसह ओप्पो कंपनीचा एक मोबाईल फोन लंपास केला आहे.
एकाच रात्री चार दुचाकींची चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वैभव करंबे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध सुरू आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांची योग्य खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करावीत तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

