(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. परकला प्रभाकर हे निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात आयोजित आंदोलनात सहभागी होणार आहेत. ‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ या मंचाच्या वतीने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. डॉ. प्रभाकर यांनी स्वतःच्या ‘एक्स’ हँडलवरून या आंदोलनातील सहभागाची माहिती दिली आहे.
या मोर्चात विविध सामाजिक संघटनांसह विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ट्रान्सजेंडर समुदायाशी संबंधित संघटना सहभागी होणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी स्थापन झालेल्या ‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ या मंचाने निवडणूक प्रक्रियेतील कथित अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्यावर खटला चालवावा, सध्या सुरू असलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि मतदार यादीतून अन्यायकारकपणे वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करावीत, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडल्या जाणार आहेत.
डॉ. परकला प्रभाकर यांनी एसआयआर प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत ही प्रक्रिया म्हणजे ‘नागरिकांचा रक्तहीन राजकीय संहार’ असल्याचे म्हटले आहे. जर्मनी किंवा रवांडामध्ये धर्म, वांशिकता अथवा वर्णाच्या आधारावर झालेल्या छळाप्रमाणेच भारतात नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून त्यांना लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे मतदानाचा अधिकार असलेले नागरिक आणि तो अधिकार गमावलेले नागरिक असे दोन गट निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रभाकर यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आता प्रत्येक गल्लीत जंतर-मंतर. शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लोकशाहीच्या स्थापनेसाठी जनआंदोलन. या, या आव्हानाचा सामना करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची (AISA) अध्यक्षा नेहा बोरा यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डॉ. परकला प्रभाकर हे केंद्र सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आले आहेत. बेरोजगारी, नोटबंदी, आर्थिक धोरणे, परराष्ट्र धोरण आणि लोकशाही संस्थांच्या स्थितीबाबत त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘द क्रुक्ड टिम्बर ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकातून त्यांनी नोटबंदीवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात लोकशाही संस्था कमकुवत होत असल्याचेही त्यांचे मत आहे.
यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूतील फ्रिडम पार्क येथे झालेल्या सीजेपीच्या विरोधातील आंदोलनातही प्रभाकर सहभागी झाले होते. त्यावेळी यूट्यूबर ध्रुव राठी आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यासोबत त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या भाजपमध्ये असल्या, तरी प्रभाकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर कठोर टीका करण्याची भूमिका कायम ठेवली आहे.
डॉ. परकला प्रभाकर यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नरसपुरम येथे झाला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) त्यांची निर्मला सीतारमण यांच्याशी भेट झाली. राजकीय विचारधारा वेगवेगळी असूनही दोघांनी १९८६ मध्ये विवाह केला. प्रभाकर यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश करत अभिनेता चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारमध्ये संचार सल्लागार म्हणून काम केले. आता एसआयआरविरोधी आंदोलनातील त्यांच्या सहभागामुळे या मोर्चाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


