(मुंबई / वृत्तसंस्था)
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझाच्या सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) डिजिटल अभिप्राय प्रणाली सुरू केली आहे. ‘राजमार्गयात्रा’ मोबाईल ॲपमध्ये ‘टोल प्लाझा फीडबॅक’ ही नवीन सुविधा आता उपलब्ध करण्यात आली. या माध्यमातून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना टोल प्लाझावरील सेवांचा अनुभव, प्रवासात आलेल्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांबाबतच्या सूचना थेट प्राधिकरणापर्यंत पोहोचवता येणार आहेत.
या सुविधेचा वापर करून प्रवाशांना टोल प्लाझावरील सेवांचे निश्चित श्रेणींनुसार मूल्यांकन करता येईल. प्रवासादरम्यान कोणत्या समस्या आल्या, यासंदर्भातील पर्याय निवडून त्यावर सविस्तर टिप्पणीही नोंदवता येणार आहे. याशिवाय, टोल प्लाझावरील सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत आपल्या सूचना मांडण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा ओलांडल्यानंतर वार्षिक पासधारकांना राजमार्गयात्रा ॲपवर अभिप्राय नोंदवण्यासंदर्भात सूचना मिळेल. त्याद्वारे ते संबंधित टोल प्लाझावरील सेवांबाबत आपले मत नोंदवू शकतील. तसेच, ॲप वापरणाऱ्या सर्व नागरिकांना मेन्यूमधील ‘टोल प्लाझा फीडबॅक’ हा पर्याय निवडून देशातील महामार्ग नेटवर्कवरील कोणत्याही टोल प्लाझाबाबत अभिप्राय देता येईल.
या डिजिटल यंत्रणेमुळे टोल प्लाझावरील सेवांमधील त्रुटी शोधणे, वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवणे आणि सुधारणांची आवश्यकता असलेली क्षेत्रे निश्चित करणे शक्य होणार आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायाच्या आधारे सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास मदत मिळेल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग वापरणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा सक्रियपणे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. टोल प्लाझावरील अनुभव, तक्रारी आणि सुधारणा सुचवणाऱ्या सूचना राजमार्गयात्रा ॲपवर नोंदवाव्यात, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. नागरिकांच्या सहभागातून टोल प्लाझावरील समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्यावर उपाय करता येतील आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील सेवांचा दर्जा उंचावता येईल, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.


