(मुंबई)
कोकण विभागाचा समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक परंपरेचा अमूल्य वारसा आता सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी पर्यटकांपर्यंत एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तालयाच्या divcomkonkan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर कोकणातील गड-किल्ले, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण कोकण विभागातील प्रसिद्ध तसेच दुर्लक्षित पर्यटनस्थळे एकाच व्यासपीठावर पाहता येणार आहेत.
हा उपक्रम पर्यटनप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि कोकणभ्रमंतीस येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. कोकण विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे समाविष्ट असून, या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैभवाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले गड-किल्ले, अरबी समुद्रालगतचे नितळ समुद्रकिनारे, हिरवीगार जंगले, नद्या, धबधबे, लेणी तसेच प्राचीन मंदिरे, दर्गे आणि चर्च यांमुळे कोकण विभाग पर्यटनाच्या दृष्टीने आगळेवेगळे स्थान राखून आहे.
संकेतस्थळावर रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, कर्नाळा यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित असलेले हे किल्ले ऐतिहासिक वारसा जपणारेच नव्हे, तर साहसी पर्यटनासाठीही आकर्षण ठरत आहेत. किल्ल्यांचा इतिहास, भौगोलिक स्थान, पोहोचण्याचे मार्ग आणि आजूबाजूची पर्यटनस्थळे यांची माहिती उपलब्ध झाल्याने पर्यटकांना सहलीचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
यासोबतच अलिबाग, मुरुड-जंजिरा, माथेरान, भिवपुरी, कर्जत, हरिहरेश्वर, दापोली, गणपतीपुळे, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, आंबोली घाट यांसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळांची माहितीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे, धबधबे, जलक्रीडा, जैवविविधता आणि स्थानिक संस्कृती यांची सविस्तर माहिती उपलब्ध झाल्याने कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळेल, असे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. एकाच संकेतस्थळावर संपूर्ण विभागाची पर्यटन माहिती उपलब्ध झाल्यामुळे कोकणातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असून, स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही कोकण विभाग अत्यंत समृद्ध आहे. मुंबईतील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरांसह गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर, हरिहरेश्वर, केळशी, चिपळूण येथील परशुराम मंदिर, कणकादित्य आदी प्रमुख धार्मिक स्थळांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यामुळे भाविकांना दर्शन आणि यात्रेचे नियोजन अधिक सुकर होणार असून, कोकणातील धार्मिक पर्यटनालाही नवी ऊर्जा मिळणार आहे.

