(मुंबई / प्रतिनिधी)
कोकणातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या रासायनिक उद्योगांबरोबरच प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात कोकणवासीयांनी एकजूट दाखवली आहे. कोकणचा निसर्ग, समुद्रसंपदा आणि स्थानिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी चांदा ते बांदा व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार मुंबईत झालेल्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या आंदोलनासाठी कोकणातील वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील सुरेंद्र गावस्कर सभागृहात जनता दल (सेक्युलर), कोकण जनविकास समिती आणि मुलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादात विविध ठराव मंजूर करण्यात आले. परिसंवादात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीमध्ये तयार होणाऱ्या ‘पीफास’ (PFAS) या रसायनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या रसायनामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला संभाव्य धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून, कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, पूर्णगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांविरोधातही तीव्र भूमिका मांडण्यात आली. या प्रकल्पांमुळे समुद्री पर्यावरण, मत्स्यसंपदा आणि कोकणातील नैसर्गिक संसाधनांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. सौरऊर्जेसारखा तुलनेने स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असताना अणुऊर्जेसारख्या खर्चिक प्रकल्पांवर सरकारचा भर का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
या परिसंवादात अणुऊर्जा अभ्यासक डॉ. मंगेश सावंत, रसायनशास्त्राचे प्राध्यापक अशोक रानडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव, प्रकाश लव्हेकर तसेच जनता दलाचे राज्य कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी मार्गदर्शन केले. कोकणच्या पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यास कोकणातील विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणच्या पर्यावरणीय आणि आर्थिक भवितव्याशी निगडित प्रश्नांवर व्यापक लोकचळवळ उभारण्याचा निर्धार या परिसंवादातून व्यक्त करण्यात आला.
मंजूर ठराव
* पीफास या घातक रसायनाच्या उत्पादनास परवानगी देण्यामागील प्रक्रिया आणि जबाबदाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
* लोटे-परशुराम आणि तळोजा परिसरातील नागरिक व कामगारांची व्यापक वैद्यकीय तपासणी करावी.
* संबंधित भागातील जलस्रोत आणि भूगर्भजलाची वैज्ञानिक चाचणी करण्यात यावी.
* रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प तत्काळ रद्द करण्यात यावेत.
* ‘अणुऊर्जा नको, सौरऊर्जा हवी’ या भूमिकेला शासनाने प्राधान्य द्यावे.
* रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा.
* कोकणातील रोजगारवाढीसाठी दुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री उद्योगांना चालना देणारी धोरणे राबवावीत.

