(पुणे)
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात एक अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली होती. खंडाळा घाटाजवळील आर.के. हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका महिलेबरोबर दोन बालकांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला असून, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हत्या करून जाळल्याचा संशय
सदर मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून, तिच्यासोबत सापडलेल्या बालकांपैकी एकाचे वय अंदाजे दीड वर्ष, तर दुसऱ्याचे सुमारे चार वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीवरून हा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ओळख पटवण्यासाठी गोंदवलेल्या खुणा महत्त्वाच्या
मृत महिलेचे शरीर अंशतः जळाल्यामुळे चेहरा ओळखू येण्याजोगा राहिलेला नाही. मात्र, तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. उजव्या हाताच्या मनगटावर ‘Badam’, ‘Mom’ आणि ‘Dad’ अशी इंग्रजी अक्षरे गोंदवलेली आहेत, तर एका हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले दिसले. पोलिसांनी या तपशिलांच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पोलीस तपास सुरू, स्केच प्रसिद्ध
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला भेट देत तपासाच्या दिशा ठरवल्या. पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलिसांनी मृत महिला व मुलांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे स्केच तयार करून प्रसिद्ध केले आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपासासाठी स्थानिक यंत्रणांचीही मदत
घटनास्थळावरून मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे पोलीस विविध प्रकारे तपास करत असून, स्थानिक यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल टॉवर लोकेशन आणि माहितीदारांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.