(जैतापूर / वार्ताहर)
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडल्या. दिनांक १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील नामवंत महाविद्यालये व नाट्यसंस्थांच्या निवडक आठ एकांकिकांचे सादरीकरण झाले. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या या एकांकिकांनी तीन दिवस ओणीतील रंगमंच नाट्यरसिकांनी गजबजून गेला.
या स्पर्धेत डी.बी.जे. (डीजे) महाविद्यालय, चिपळूण यांची ‘पाकिस्तानचे यान’ ही एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे यांची ‘थिम्मका’ या एकांकिकेला द्वितीय, तर नाट्य परिवार, ठाणे यांची ‘स्वस्तिकाची ट्रॅजेडी’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २० हजार रुपये, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथील सिद्धेश नांदलसकर यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना व सर्वोत्कृष्ट नेपथ्य या दोन्ही पारितोषिकांचा मान मिळाला. नाट्य परिवार, ठाणे येथील सौरभ सिद्धांत यांना सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिक देण्यात आले. ‘पाकिस्तानचे यान’ या एकांकिकेसाठी महेश कापरेकर व प्रतीक चौधरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तर सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथील ‘थिम्मका’साठी अजय पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक देण्यात आले. नाट्य परिवार, ठाणे येथील अजय सुमेध यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक, तर ‘पाकिस्तानचे यान’साठी अनिकेत शिगवण व प्रतीक चौधरी यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
उत्कृष्ट अभिनयामध्ये अपर्णा घोगरे (सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दीपक माणगावकर (रत्नागिरी) यांनी द्वितीय, स्नेहा पराडकर (नाट्यनाथ, मुंबई) यांनी तृतीय, शुभम लेले (नाट्य परिवार, ठाणे) यांनी चतुर्थ तर संकेत खंडागळे (रंगोदय रूपांतर, मुंबई) यांनी पंचम क्रमांक मिळवला.
ही राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा ज्ञानवंत अॅड. वासुदेव शंकर तुळसणकर ज्ञानसंकुल, ओणी येथे ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी संचलित नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी तसेच श्री शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल, ओणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन माननीय केदार सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी माननीय प्रमोद लिमये, गंगाधर तुळसणकर, सूर्यकांत तुळसणकर, सूर्यकांत सुतार, गणेश गांधी, रामचंद्र जानस्कर, नाथ गांधी, अरविंद गोसावी, गणपत भारती, नामदेव तुळसणकर, विश्वनाथ वडवलकर, निलेश खातू, महादेव धुरे, गणपत जानस्कर, संतोष वडवलकर, अॅड. एकनाथ मोंडे, अनंत नागम, संजय सावंत, दत्ताराम जडयार, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, चंद्रकांत आंगवलकर, सिद्धिविनायक तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते श्री. श्रीनिवास नार्वेकर तसेच प्रतिथयश नेपथ्यकार श्री. नितिनजी नेरुरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार वागळे, कार्यवाह अॅड. गुरुदत्त खानविलकर, कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, अध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर, नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद मिरगुले तसेच शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका साक्षी शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
दररोज सायंकाळी सहा वाजता श्रीमती मंगला मारुतीराव सावंत रंगमंच, नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी येथे झालेल्या या स्पर्धेमुळे ओणी परिसरात राज्यस्तरीय नाट्यचळवळीचा उत्सव साजरा झाल्याचे चित्र दिसून आले.

