(पुणे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) 2026 मध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेणार आहे. या परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी DigiLocker मध्ये आपली गुणपत्रिका उपलब्ध होण्यासाठी APAAR ID (अपार आयडी) नोंदणी करणे अनिवार्य आहे.
राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत की, शक्य तितक्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा APAAR ID तयार करून त्याची नोंद मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करावी. केंद्र शासनाने देखील प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करण्याचे आदेश राज्य शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. याअनुषंगाने मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा APAAR ID तयार करण्याचे काम सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका DigiLocker मध्ये उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सुरक्षित, केंद्रीकृत आणि कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहतील. यामुळे शैक्षणिक संस्था प्रवेश प्रक्रियेसाठी त्वरित पात्रता पडताळणी करू शकतात. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसाठी हार्ड कॉपीची आवश्यकता नाही. हे उपक्रम सरकारी शिष्यवृत्ती, योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर सोयीचे ठरतात.
राज्य मंडळाच्या निर्देशानुसार, सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी APAAR ID नोंदणी पूर्ण करण्यासोबत कार्यवाहीचा अहवाल देखील मंडळाकडे सादर करावा. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कुठूनही सुरक्षितपणे उपलब्ध होऊ शकतील आणि कागदपत्रे हरवण्याचा धोका टळेल.
महाराष्ट्र बोर्डच्या 2026 इयत्ता दहावी-बारावी परीक्षांसाठी या डिजिटल सुविधा विद्यार्थ्यांना सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रवेश प्रक्रिया सुनिश्चित करतील.

