(नवी दिल्ली)
बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संरक्षण उत्पादन विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान सीबीआयने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकून तब्बल 2.36 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या श्रीगंगानगर (राजस्थान) येथील निवासस्थानातूनही 10 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा (उप नियोजन अधिकारी – आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात), कर्नल काजल बाली (कमांडिंग ऑफिसर, 16 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिट, श्रीगंगानगर), दुबईस्थित एका कंपनीसह अन्य काही जणांचा समावेश आहे. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एका कंपनीचे कामकाज पाहणारे राजीव यादव आणि रवजीत सिंह हे बेकायदेशीर मार्गाने सवलती मिळवण्यासाठी शर्मा यांच्या संपर्कात होते. या कंपनीच्या सांगण्यावरून 18 डिसेंबर 2025 रोजी विनोद कुमार याने शर्मा यांना 3 लाख रुपयांची लाच दिली होती. या प्रकरणी विनोद कुमार यालाही सीबीआयने अटक केली आहे.
सीबीआयच्या छाप्यांमध्ये शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून 2.23 कोटी रुपयांची रोकड तसेच लाचेचे 3 लाख रुपये जप्त करण्यात आले, तर त्यांच्या पत्नीच्या श्रीगंगानगर येथील घरातून 10 लाख रुपये जप्त करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयाने 23 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.

