(रायगड )
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील एका लॉजमध्ये एका अज्ञात तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणीचे वय अंदाजे २२ वर्षे असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी लॉजमधील कर्मचाऱ्यांना एका खोलीत संशयास्पद हालचाल जाणवली. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडण्यात आला असता, तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपीने तरुणीच्या अंगावर धारधार शस्त्राने सपासप वार करून तिला जागीच ठार केले. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून हल्ल्याचे स्वरूप अत्यंत क्रूर असल्याचे दिसून आले. मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत एका लॉजमध्ये दि. २० एप्रिल रोजी रुम नंबर १०१ मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाणे येथील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, ठसे आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. तरुणीला लॉजवर घेऊन जाणारा संशयित तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सध्या पोलिसांसमोर मृत तरुणीची ओळख पटविणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मृत तरुणी स्थानिक रहिवासी असल्याचेही चर्चा आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, लॉजमध्ये येणाऱ्या ग्राहकांची ओळख पडताळणी आणि नोंद ठेवणे बंधनकारक असतानाही अशा घटना घडल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटक आणि स्थानिक महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
या हत्येमागे प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद किंवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण घटनेनंतर लोणेरे परिसरात तणावाचे वातावरण असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

