(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कुटुंब नियोजनाची संपूर्ण जबाबदारी केवळ महिलांनीच उचलायची, ही मानसिकता आजही बदललेली नसल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्यभरात पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात आला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला असून, या संपूर्ण कालावधीत केवळ एका पुरुषाने नसबंदी शस्त्रक्रिया केल्याची नोंद झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १,८५७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १,८५१ महिलांनी पुढाकार घेत कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, याच कालावधीत केवळ सहा पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाबाबत आजही पुरुषांमध्ये असलेले गैरसमज ठळकपणे समोर आले आहेत.
एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत महिलांच्या तुलनेत पुरुषांचा सहभाग अत्यंत नगण्य राहिला आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करून जबाबदारी पार पाडली असताना, पुरुषांचा आकडा केवळ सहावरच मर्यादित राहिला आहे. कुटुंब नियोजनाच्या प्रक्रियेत पुरुषांचा सहभाग वाढवणे, तसेच नसबंदीबाबत असलेली भीती, शंका आणि गैरसमज दूर करणे हे पुरुष नसबंदी पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट होते. मात्र, जिल्ह्यातील अल्प प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिलांवरच जबाबदारी, पुरुष मोकळे
कुटुंब नियोजन ही महिलांचीच जबाबदारी आहे, असा सामाजिक गैरसमज आजही ग्रामीण व शहरी भागात रुजलेला आहे. परिणामी, आरोग्याच्या दृष्टीने तुलनेने सोपी आणि सुरक्षित असलेली पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याकडे पुरुषांचा कल दिसून येत नाही. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत असलेले गैरसमज, भीती आणि चुकीची माहिती दूर करण्यासाठी अधिक व्यापक आणि प्रभावी जनजागृती मोहिमांची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
नसबंदीनंतर आर्थिक प्रोत्साहन
नसबंदी शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना १,४५१ रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. तसेच, खुल्या प्रवर्गातील महिलांना २५० रुपये, तर बीपीएल प्रवर्गातील महिलांना ६०० रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. तरीही पुरुषांचा सहभाग नगण्य राहिल्याने, नसबंदीबाबतचा सामाजिक दृष्टिकोन कधी बदलेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

