(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणपतीपुळे येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी (६ डिसेंबर) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास चंपक मैदान परिसरात घडली. अपघातातील जखमींची नावे निखिल प्रकाश वाघमारे (२२, रा. महादेवनगर, जांभुळफाटा, रत्नागिरी) आणि यश रविंद्र घोगरे (२०, रा. समाज कल्याण वसतिगृह, कुवारबाव; मूळ रा. घाटकोपर, मुंबई) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यश घोगरे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४७ एए ८०५०) घेऊन गणपतीपुळेकडे निघाला होता. त्याच्यासोबत निखिल वाघमारे हा मागील सीटवर बसलेला होता. आरेवारे मार्गे दोघेही गणपतीपुळ्याकडे जात असताना ते चंपक मैदानासमोर पोहोचल्यावर दुचाकी अचानक घसरली व दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमी यश आणि निखिल यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख सुरू आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

