(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाटद मिरवणे ग्रामपंचायतीतील स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी तक्रारदाराने मागील तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा करत असून, संबंधित विभाग, तसेच आमदार व पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाशी तब्बल २५ महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. या पाठपुराव्याची दखल अखेर २१ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वतः मंत्री महोदयांनी घेत, जिल्हाधिकाऱ्यांना तपास करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर आदेश फॉरवर्ड करताच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून “मेल मिळालाच नाही” असा थेट दावा करण्यात आला. हा दावा केवळ हास्यास्पदच नाही, तर जिल्हा प्रशासनाच्या दुलर्क्ष वृत्तीचे लक्षणही ठरतो. विशेष म्हणजे, याच ईमेलची अधिकृत नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दस्तावेजांमध्ये असून, ती तक्रारदाराने स्वतः जिल्हा परिषदेच्या संबंधित कार्यालयात सादर देखील केली होती.
या प्रकारामुळे पालकमंत्री यांच्या आदेशालाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून किती कमी महत्त्व दिलं जातं, हे उघड होतं. जर मंत्र्यांचे आदेशच असा अवमान केला जात असेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासन किती गंभीरपणे पाहत असेल याची कल्पना करणे कठीण नाही. तक्रारीचा गांभीर्याने पाठपुरावा करताना तक्रारदाराने माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळवलेल्या दस्तावेजांमधून हे स्पष्ट झाले आहे की, संबंधित विभाग आणि अधिकारी यांनी जाणूनबुजून मेल मिळाल्याचे नाकारले. यामुळे प्रश्न उपस्थित होतो – ही निष्क्रियता आहे की घोटाळेखोरांना वाचवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न?
शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच नागरिकांच्या विश्वासाला तडा देणे होय. प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तात्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घोटाळ्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या लढ्यात सामान्य नागरिकासोबतच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अधिकाराला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांनाही न्याय मिळणे तितकेच महत्त्वाचे….
सामान्य माणसाला न्याय मिळणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नेहमीच पारदर्शक व लोकहिताच्या भूमिकेचा अवलंब केला आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहून योग्य तो न्याय दिला जाईल. आमचे आमदार व पालकमंत्री देखील या प्रकरणात अन्यायग्रस्त ठरत असल्यामुळे त्यांनाही न्याय मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आमचे सर्व ग्रामस्थ एकवटले असून आम्ही शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपला आवाज पोहोचवत आहोत.”
– निलेश रहाटे