(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ६ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांनी एक मार्गदर्शक परिपत्रक जारी करत, लाऊडस्पीकर आणि ध्वनीवर्धक उपकरणांच्या वापराबाबत कठोर निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालनालय, मुंबई यांच्या स्थायी आदेश क्र. ०२/२०२५ नुसार, ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना कारवाईसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशानुसार, अनधिकृतपणे वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर, डीजे सिस्टीम्स, साउंड सिस्टीम यांसारख्या साधनांमुळे होणाऱ्या अतिरिक्त आवाजामुळे नागरिक त्रस्त होत असून, त्यावर त्वरित कारवाईची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा वापर केल्यास पोलिसांकडून त्वरित हस्तक्षेप करण्यात येणार असून, उपकरणे जप्त करण्यात येतील. यासाठी पोलिसांकडे नॉईज लेव्हल मीटर उपलब्ध असून, ठिकाणीच आवाजाच्या मर्यादेचे परीक्षण केले जाईल. परवानगीविना लाऊडस्पीकर वापरल्यास तो तात्काळ बंद करण्यात येणार असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्यातील औद्योगिक, व्यापारी, निवासी आणि शांतता क्षेत्रांमध्ये आवाजाच्या पातळ्यांसाठी ठरवलेली मर्यादा स्पष्ट करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसाला ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल, व्यापारी क्षेत्रात दिवसाला ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी भागात दिवसाला ५५ व रात्री ४५ डेसिबल तर शांतता क्षेत्रात दिवसाच्या वेळेस ५० आणि रात्री ४० डेसिबलपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे. यापेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या कोणत्याही साधनांचा वापर प्रतिबंधित आहे. ध्वनीप्रदूषणासंदर्भात नियमभंग केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३६ नुसार गुन्हा दाखल केला जाईल. यासाठी संबंधित व्यक्तीस एक लाख रुपये दंड तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. त्याचबरोबर पोलीस कायदा कलम १४९ नुसार तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली जाऊ शकते.
लाऊडस्पीकर वापरासाठी परवानगी घेणे अनिवार्य असून, त्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पोर्टलचा दुवा https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login असा असून, नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आवश्यक ती परवानगी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

