(नाशिक)
बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान करणाऱ्या मोठ्या घोटाळ्याचा भंडाफोड नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना ३ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई आणि अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यासह काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर व संवेदनशील स्वरूपाचा हा गुन्हा लक्षात घेता पोलीस आयुक्त संदिप कर्णिक आणि पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाने प्राप्त कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे तपास वाढविला. त्यातून नितीन उपासनी यांचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे उघडकीस आले आणि त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

