(रत्नागिरी
शहरानजीकच्या मिरजोळे येथील हनुमाननगर परिसरात सिमेंटचा विजेचा खांब अचानक तुटल्याने त्यावर काम करणारे दोन कामगार खाली कोसळून जखमी झाल्याची घटना गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधन बुद्धिब चौधरी (वय २४) आणि फूलचंद सुखदेव चौधरी (वय २३, रा. मिरजोळे, रत्नागिरी) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. या दोघांवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दुपारी साधन व फूलचंद हे मिरजोळे हनुमाननगर परिसरात ३३ केव्ही विद्युत वाहिनी ताणण्याचे काम करत होते. त्यावेळी ते सिमेंटच्या विजेच्या खांबावर चढले असतानाच अचानक खांब तुटला. परिणामी दोघेही थेट खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, विद्युत कामांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

