(रत्नागिरी)
अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. दिपक बाबू माने (वय ३०, रा. पटवर्धनवाडी, उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १० डिसेंबर रोजी दिपक माने याने राहत्या घरी अज्ञात कारणामुळे गवत मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळातच त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच १७ डिसेंबर रोजी दिपक माने याला पुन्हा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणाची नोंद शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

