( रत्नागिरी )
दापोली तालुक्यातील हर्णे येथे चुलीवर पाणी तापवत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार, ५ मार्च रोजी सकाळी सुमारे ११.०० वाजता घडली.
शेवंती बाळकृष्ण चौधरी (वय ६७, रा. हर्णे, दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवार, ३ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता त्या राहत्या घरी आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापवत होत्या. यावेळी चुलीतून अचानक आगीचा भडका उडाल्याने त्यांच्या अंगावरील कपड्यांना आग लागली आणि त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
नातेवाईकांनी त्यांना तातडीने दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

