( मुंबई )
सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना उघडकीस आल्यानंतरही राज्य सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई करून मोठा ड्रग्ज कारखाना उघड केला असताना, अद्याप या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारावर ठोस कारवाई झालेली नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून, या परिसरात त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या नावाशी संबंधित काळा धंदा सुरू असल्याचे आरोप आहेत. सावळीतील ड्रग्ज कारखान्याचे प्रकरण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कथित लागेबांधे यामुळेच सरकार कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज निर्मिती सुरू असताना सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात एवढा मोठा ड्रग्ज कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना असतानाही त्यांनी कारवाई केली नाही. अखेर मुंबई क्राईम ब्रँचने पुढाकार घेऊन ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याचा आरोप करत, हे तेच अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या माता-भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. त्यामुळे साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात शिंदे आणि फडणवीस यांची मिलीभगत आहे का, याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिले पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
याचबरोबर, सातारा ड्रग्ज प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मदतीने महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नसताना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. १५ तारखेला मतदार याद्या जाहीर होणार होत्या, मात्र आता त्या बूथनिहाय २७ तारखेला जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना अर्जामध्ये उमेदवार, सुचक आणि अनुमोदक यांना मतदार यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र मतदार याद्याच उपलब्ध नसतील तर अर्ज कसे भरणार, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.
निवडणूक कार्यक्रम घाईघाईने जाहीर करून निवडणूक आयोगाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे, असा तीव्र आरोप करत सपकाळ यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

