(रत्नागिरी )
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 320 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी . स्टँड समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. कै. विमलाबाई बळवंत लेले आणि कै. द्वारकानाथ सिताराम बाळ स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेत पुण्याची उदयोन्मुख युवा गायिका कु. सावनी शिखरे हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या सादरीकरणाने सदरहू मैफल रंगतदार झाली.
कार्यक्रमाचे सुरवातीला पुणे येथील श्री. किरण बापट यांचे हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होऊन श्रीफळ वाढविले गेले. प्रदीप तेंडूलकर यांनी प्रस्तावना करून कलाकारांची ओळख करुन दिली. अध्यक्ष मनोहर जोशी यांचे हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला.
मैफिलीची सुरवात राग श्री मधील तिलवाडा तालात निबद्ध असलेल्या ‘वारी जाऊ रे’ या बडा ख्यालाने झाली. त्यानंतर तराणा व राग यमन मधील एक बंदिश झाली. विदुषी मंजुषा कुलकर्णी-पाटील ,पंडित उल्हास कशाळकर व अन्य गुरूं कडून गायनाचे संस्कार झालेल्या सावनीने रागाची मांडणी आलाप, ताना याद्वारे चांगली केली.त्यानंतर तिने का धरीला परदेस , पद्मनाभा नारायणा, ज्या सुखा कारणे देव वेडावला, विष्णुमय जग,एकच रे मागणे व शेवटी अगा वैकुंठीच्या राया या भैरवीतील अभंगाने तीने मैफलीचा शेवट केला.
सावनीच्या आवाजाला आस चांगली असल्यामुळे तिचे गायन कर्णमधुर झाले. कार्यक्रमाला तेवढीच तोलामोलाची व सफाईदार साथसंगत संवादिनी – पुण्याचे प्रसिद्ध युवा वादक श्री. अथर्व कुलकर्णी व तबला रत्नागिरी चे प्रसिद्ध युवा वादक श्री. प्रथमेश शहाणे यांनी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी र ए सोसायटी, गोदूताई जांभेकर विद्यालय, संजय बर्वे, दिलीप केळकर तसेच किरणजी बापट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

