(पालघर)
जिल्ह्यातील सफाळे जवळील उसरणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढत्या कर्जाच्या तणावाला कंटाळून पती-पत्नीने एकाच साडीचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कैलास दत्तात्रेय किणी (वय 47) आणि कोमल कैलास किणी (वय 38) हे पती-पत्नी आपल्या 19 वर्षीय मुलगी किमया हिच्यासोबत वास्तव्यास होते. कैलास किणी हे गावात किराणा दुकान चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मुलीने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती. मात्र, सफाळे परिसरात सुरू केलेल्या व्यवसायासाठी घेतलेले बँकेचे कर्ज वाढतच गेले होते. त्यातच देणेकऱ्यांचा तगादा आणि आर्थिक अडचणींमुळे दोघेही मानसिक तणावाखाली होते. कैलास किणी यांना मधुमेहाचाही त्रास होता, त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.
घटना कशी उघडकीस आली?
मंगळवारी किमया परीक्षा देण्यासाठी ठाण्यात गेली होती. त्या दरम्यान तिने वडिलांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे तिने आपल्या नातेवाईकांना संपर्क केला. नातेवाईक घरी पोहोचले असता घराचे दरवाजे आतून बंद असल्याचे आढळले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, कोमल किणी यांनी हॉलमध्ये तर कैलास किणी यांनी बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले.
प्राथमिक तपासात वाढते कर्ज आणि आर्थिक ताण यामुळेच या पती-पत्नीने टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लाखो रुपयांच्या कर्जामुळे ते नैराश्यात होते, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे त्यांच्या मुलगी किमयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या शिक्षणातून चांगली नोकरी मिळवून आई-वडिलांना या संकटातून बाहेर काढण्याची तिची इच्छा होती, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली.
या प्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून आर्थिक तणावामुळे वाढणाऱ्या अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

