(पिंपरी चिंचवड)
“भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही,” असा थेट आणि आक्रमक हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर चढवला आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या कारभारावर आणि आर्थिक नियोजनावर गंभीर आरोप केले.
अजित पवार म्हणाले, “भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली आहे. शहरात दिवसाढवळ्या लुटारूंची टोळी वावरत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2025 मध्ये व्हायला हवी होती. 1992 पासून मी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी सातत्याने काम केलं. त्या काळात अनेक नेत्यांनी मला आशीर्वाद दिले. 1992 ते 2017 या काळात शहराचा कायापालट केला.”
2017 च्या निवडणुकीचा उल्लेख
“2017 मध्ये मोदी लाट होती. अनेक सहकारी बाजूला गेले. त्याच वेळी विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. विशेष म्हणजे ज्या महापौरांच्या काळात हा प्रकार घडला, ते आज भाजपमध्ये आहेत आणि आमच्याविरोधात लढत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “2017 पूर्वी पिंपरी महापालिकेकडे 4,844 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. आज त्या 2,000 कोटींवर आल्या आहेत. ठेवी वाढायला हव्या होत्या, पण उलट घट झाली. कर्जरोखे काढून कोट्यवधींचं कर्ज घेण्यात आलं. एवढा पैसा खर्च केला असेल, तर विकासाची ठोस कामं दाखवा,” असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

