( नवी मुंबई )
लोकल ट्रेन मध्ये मदत मागण्याचा बहाणा करत 15 दिवसाच्या बाळाला सोडून आई फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 1 जुलै च्या दुपारची आहे. सीएसएमटी- पनवेल (CSMT-Panvel) दरम्यान हा प्रकार घडला आहे. हातात सामान आणि बाळ आहे मदत करा असं म्हणत आईने दोन मुलींकडे बाळ दिले. सीवूड्स स्थानकामध्ये उतरायचं आहे असं सांगितलं. मुली उतरल्या पण आई उतरलीच नाही. नंतर परतही आली नाही. मुलींनी वाट पाहिली पण ती महिला परत न आल्याने अखेर तक्रार दाखल केली. सध्या फरार महिलेचा शोध सुरू आहे. संबधित महिला अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आहे.
नवी मुंबईतील जुईनगर इथं राहणारी दिव्या नायडू (19) आणि तिची मैत्रीण भूमिका माने (20) या दोघी चेंबूरहून लोकल ट्रेननं घरी जात होत्या. त्याच वेळी लोकल ट्रेनमध्ये एक अनोळखी महिला त्यांना सानपाडा स्थानकात भेटली. “माझ्याकडं बाळ आणि बरचसं सामान देखील आहे. मला सीवूड्स रेल्वे स्थानकात उतरायचं आहे. बाळ हातात असल्यानं मला ट्रेनमधून उतरण शक्य नाही. त्यामुळे तुम्ही मला बाळाला घेऊन उतरण्यासाठी मदत कराल का?” असं सांगत तिनं त्या दोघींकडे मदत मागितली. सीवूड्स रेल्वे स्थानक आल्यानंतर महिलेनं बाळ त्यांच्या हातात दिलं. मात्र, संबधित महिला स्वतः लोकलमधून उतरलीच नाही. सुरवातीला हातात जास्त सामान असल्यानं महिलेला लोकलमधून उतरायला जमत नसेल, असा या दोन्ही तरुणींचा समज झाला. मात्र, बराच वेळ वाट बघूनही संबंधित महिला खाली उतरलीच नाही. त्यानंतर अखेर त्या दोन तरूणींनी बाळाला घेऊन वाशी रेल्वे पोलिसांकडं तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये वाशी रेल्वे पोलिस सध्या 30-35 वर्षीय महिलेचा शोध घेत आहेत. महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता (BNS) कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने सध्या मुलींचा तपास सुरू आहे. बाळाच्या आईविषयी किंवा तिच्या ओळखीविषयी कोणाकडेही माहिती असल्यास, वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.