(मुंबई)
कलर्स मराठीवरून बिग बॉस मराठी सिझन 6 (Bigg Boss Marathi 6) चा बहुप्रतीक्षित प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अधिक व्ह्यूज मिळवत हा प्रोमो ट्रेंडमध्ये आला आहे. “स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…” या ओळींपासूनच भावनांचा सूर पकडणारा हा प्रोमो महाराष्ट्राच्या मनात घर करून बसला आहे.
11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी 6 सुरू
बिग बॉस हिंदी संपल्यानंतर मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती घडी आता जवळ आली आहे. 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सिझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा शो कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहता येणार आहे.
‘भाऊ’च्या स्वॅगने प्रोमो गाजला
पारंपरिक वेशभूषेत, दमदार स्वॅगमध्ये दिसणारे रितेश देशमुख केवळ शोचे होस्ट नसून ते महाराष्ट्राचा ‘भाऊ’ आहेत, हे या प्रोमोने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणुकीतून होणारी त्यांची एंट्री, हजारो लोकांचा जल्लोष आणि आजीच्या मिठीतला हळवा क्षण—प्रत्येक फ्रेममधून आपुलकी, संस्कृती आणि महाराष्ट्रप्रेम ओसंडून वाहत आहे.
“मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार!” या कडक संवादाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. यंदा स्वॅग तोच असला, तरी पॅटर्न मात्र भाऊचा असणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नवे ट्विस्ट, नवे स्पर्धक… उत्सुकता शिगेला
बिग बॉस मराठीच्या मागील सिझनला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. स्पर्धकांमधील वाद, मैत्री, डावपेच आणि भावनिक क्षण यामुळे हा शो नेहमीच चर्चेत राहिला. यंदा घरात कोणते सेलिब्रिटी प्रवेश करणार, कोणते नवे टास्क असणार आणि बिग बॉस कोणते धक्कादायक ट्विस्ट आणणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भव्य सेट, 300 लोकांची उपस्थिती
भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 300 लोकांच्या उपस्थितीत हा प्रोमो शूट करण्यात आला. रितेश देशमुख पहिल्यांदाच पारंपरिक वेशभूषेत दिसल्याने चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
महाराष्ट्रात एकच चर्चा – बिग बॉस मराठी 6
सध्या महाराष्ट्रात एकच विषय चर्चेत आहे—बिग बॉस मराठी सिझन 6. या प्रोमोसोबतच नव्या सिझनची अधिकृत घोषणा झाली असून, प्रेक्षक भरपूर मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. मनोरंजनासोबतच हा सिझन रोजच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार, हे नक्की.
यंदा Swag कुणाचा? पॅटर्न कसा असणार? घरात कोण कोण येणार? याची उत्तरं मिळण्यासाठी आता फक्त 11 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे.
स्पर्धकांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी बिग बॉस मराठी 6 (Bigg Boss Marathi Season 6) संदर्भात सोशल मीडियावर संभाव्य स्पर्धकांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते आणि बिग बॉसप्रेमी यंदा घरात कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार, याबाबत उत्सुक आहेत. सध्या संभाव्य 17 स्पर्धक चर्चेत आहेत.
गिरीजा ओक
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या विशेष चर्चेत आहे. निळ्या साडीतल्या तिच्या व्हायरल पॉडकास्टमुळे ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. तिची बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री झाली, तर ती घरात वेगळीच छाप पाडू शकते, अशी चर्चा आहे.
रसिका सुनील
प्रत्येक सिझनमध्ये नाव चर्चेत येणारी अभिनेत्री रसिका सुनील यंदाही बिग बॉस मराठी 6 साठी विचाराधीन असल्याचं सांगितलं जात आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली असून तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे घरात रंगत वाढू शकते.
ईशा केसकर
‘जय मल्हार’ मालिकेतील बानू म्हणून ओळख मिळवलेली ईशा केसकर देखील संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आहे. तिचा अभिनय आणि ड्रामॅटिक स्वभाव घरात चर्चेचा विषय ठरू शकतो. नुकतीच तिने ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका सोडल्यामुळे ती चर्चेत होती.
ज्येष्ठ आणि लोकप्रिय चेहरे
ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांचं नावही चर्चेत असून, त्यांच्या अनुभवामुळे घरात परिपक्व आणि समतोल खेळ पाहायला मिळू शकतो. विनोदी कलाकार विजय पाटकर घरात आल्यास हलकाफुलका आणि मनोरंजक माहोल निर्माण होण्याची शक्यता आहे.
अभिनेता समीर परांजपे गंभीर आणि आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जाऊ शकतो. ‘हास्यजत्रा’मुळे लोकप्रिय झालेला गौरव मोरे आणि अभिनेता अंशुमन विचारे हेही चर्चेतील संभाव्य स्पर्धक आहेत.
तरुण आणि सोशल मीडिया फेव्हरेट्स
गायक रोहित राऊत, सोशल मीडिया स्टार डॅनी पंडित, रीलस्टार अनुश्री माने आणि अर्थव रुके यांची नावं विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहेत. तसेच नृत्यांगना गौतमी पाटील घरात आली तर शोच्या टीआरपीत मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इतर चर्चेतली नावं
‘बिग बॉस हिंदी’मध्ये झळकलेले गुणरत्न सदावर्ते मराठी सिझनमध्येही सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आहे. याशिवाय हॉटेल व्यवसायाशी संबंधित नागेश मडके, रवी काळे आणि लक्ष्मण भोसले यांची नावंही सोशल मीडियावर फिरत आहेत.
एकूणच, बिग बॉस मराठी 6 बाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापैकी कोणते चेहरे प्रत्यक्षात बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार, हे लवकरच अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे.

