राहाता (जि. अहमदनगर):
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेले निळवंडे धरणाचे पाणी अखेर मंगळवारी गावात पोहोचले. पाणी आल्याचा आनंद साजरा करताना संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने आनंदाचा क्षण शोकसागरात बदलला. बंधाऱ्यात आलेल्या पाण्यात दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावातील भांबारेमळा येथे घडली. मृत भावंडांची नावे साहिल प्रशांत डोषी (वय १२ वर्षे) आणि त्याची मोठी बहीण दिव्या प्रशांत डोषी (वय १५ वर्षे) अशी आहेत. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही दोघे भावंडं बंधाऱ्यात आलेल्या पाण्यात आनंदासाठी पोहण्यासाठी उतरली. मात्र, पाण्याचा जोर व खोलीचा अंदाज न आल्याने, ते पाण्यात बुडाले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अनेक वर्षानंतर प्रथमच कोऱ्हाळे गावात निळवंडेचे पाणी मंगळवारी दाखल झाले होते, परंतु या पाण्याचा साठा बुधवारी अ अचानक वाढला होता थोडा गारवा मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.
घटनेची माहिती मिळताच गावात एकच गोंधळ उडाला, तर डोषी कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली. एकाच घरातील दोन मुलांचे असे अकाली निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली. घटनेनंतर राहाता पोलिस, शिर्डी नगरपरिषद, आणि शिर्डी साईबाबा संस्थानच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
गावासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेले निळवंडेचे पाणीच एका कुटुंबासाठी काळ बनून आले. उन्हाच्या झळा टाळण्यासाठी आणि थोडा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या भावंडांचे अचानक असे जाणे, गावासाठी मोठा धक्का ठरला आहे.