आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग असून, येथे खेळून अनेक खेळाडूंनी आपलं आंतरराष्ट्रीय करिअर घडवलं आहे. आता आयपीएल 2026 हंगामासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सर्व संघांनी आपापल्या राखीव आणि सोडलेल्या खेळाडूंच्या याद्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावाकडे लागलं आहे.
आयपीएल 2026 चा मिनी-लिलाव 16 डिसेंबर रोजी अबुधाबी येथे पार पडणार असून, हा लिलाव एका दिवसात पूर्ण होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. हा मिनी लिलाव असल्यामुळे यावेळी राईट टू मॅच (RTM) कार्डचा वापर संघांना करता येणार नाही, हे विशेष आहे.
या लिलावासाठी एकूण 359 खेळाडूंची निवड करण्यात आली असून, सर्व संघ मिळून फक्त 77 खेळाडू खरेदी करू शकतात. यामध्ये 31 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा 40 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह नोंदणी केली आहे. यामध्ये भारताचे वेंकटेश अय्यर आणि रवी बिश्नोई यांसारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएलच्या नियमानुसार, प्रत्येक संघात किमान 18 आणि कमाल 25 खेळाडू असू शकतात. कोणताही संघ जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू आपल्या ताफ्यात ठेवू शकतो, मात्र त्यापैकी फक्त 4 परदेशी खेळाडूंनाच अंतिम अकरामध्ये खेळवता येते.
दरम्यान, लिलावासाठी सर्वाधिक पर्स कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडे आहे. केकेआरकडे तब्बल ₹64.30 कोटी शिल्लक आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडे ₹43.40 कोटी उपलब्ध आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स (MI) कडे लिलावासाठी सर्वात कमी ₹2.75 कोटी शिल्लक आहेत.
- IPL 2026 लिलाव : संघनिहाय उपलब्ध पर्स (कोटी रुपयांत)
कोलकाता नाईट रायडर्स – ₹64.30 - चेन्नई सुपर किंग्ज – ₹43.40
- सनराइजर्स हैदराबाद – ₹25.50
- लखनऊ सुपर जायंट्स – ₹22.95
- दिल्ली कॅपिटल्स – ₹21.80
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु – ₹16.40
- राजस्थान रॉयल्स – ₹16.05
- गुजरात टायटन्स – ₹12.90
- पंजाब किंग्ज – ₹11.50
- मुंबई इंडियन्स – ₹2.75
आता कोणता संघ कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लावणार, कोणाला संधी मिळणार आणि आयपीएल 2026 साठी संघांची ताकद कशी बदलेल, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.

