(अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलमध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामुळे चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मुलाचे बाबा गुरांना चारा टाकायला गेले असताना मुलगा खेळत घराच्या दाराशी उभा होता, तिथे अचानक बिबट्या आला आणि त्याला घेऊन गेला. या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. बालकाला जागेवरच उचलून ठार केले. या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग रहातात. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत नजीकच्या गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले. चार वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केल्याने संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले.
दोन दिवसांपूर्वीच अहमदनगर प्रशासनाने बिबट्याला पकडण्यासाठी २०० पिंजरे उभारले होते, परंतु नरभक्षक बिबट्याचा शोध अद्याप लागलेला नाही. बालकाच्या कुटुंबाने सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला, मात्र प्रशासनाने बिबट्याला मारण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी मृतदेह स्वीकारला.
मृत बालक सिद्धेश कडलगवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वन विभागाने नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू ठेवला आहे आणि परिसरात नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना वन्यप्राणी आणि मानवी वस्तीच्या संघर्षाचे गंभीर उदाहरण ठरली असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याविरोधात तातडीच्या कारवाईची मागणी जोर धरत आहे.

