हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू गावात सरपंचपदाच्या निवडणुकीबाबत एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे. पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली EVM आणि निवडणूक नोंदींची फेरतपासणी करण्यात आली आणि त्या आधारे निकाल बदलण्यात आला.
ही निवडणूक 2 नोव्हेंबर 2022 रोजी झाली होती. यामध्ये मोहितकुमार यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. मात्र काही कालावधीनंतर, निवडणूक अधिकाऱ्यांनी मतांची अदलाबदली झाल्याचा दावा केला आणि कुलदीप यांना 51 मतांनी विजयी घोषित केलं.
काय घडलं नेमकं?
-
या निवडणुकीत मोहितकुमार आणि कुलदीप यांच्यात थेट लढत झाली होती.
-
पहिल्या मतमोजणीत मोहितकुमार विजयी ठरले होते.
-
मात्र नंतर निकालात बदल करत कुलदीपला विजयी घोषित करण्यात आलं.
-
यावर नाराज झालेल्या मोहितकुमार यांनी हायकोर्टात धाव घेतली.
-
हायकोर्टानं निकालाला स्थगिती दिली, पण फेरमतमोजणीची मागणी फेटाळली.
-
मोहितकुमारनं हार मानली नाही आणि सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
-
न्यायालयानं निवडणुकीत वापरलेली EVM आणि अन्य नोंदी मागवल्या.
-
रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली फेरमतमोजणी झाली आणि मोहितकुमारला 1051, तर कुलदीपला 1000 मते मिळाल्याचं स्पष्ट झालं.
-
अखेर सर्वोच्च न्यायालयानं मोहितकुमारला विजयी घोषित केलं.
या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी ईव्हीएमवरील संशय आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनीही मतांची चोरी आणि ईव्हीएमवरून गंभीर आरोप केले आहेत
हरियाणातील या घटनेमुळे ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर नव्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, याचा राजकीय परिणाम राष्ट्रीय पातळीवरही दिसून येऊ शकतो.

