(मुंबई)
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक तारखा जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात कोणत्याही क्षणी मोठी राजकीय घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, आज किंवा उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते लवकरच पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत.
ठाकरे बंधू महाविकास आघाडी (MVA) सोबत युती करून निवडणुका लढवणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मनसेबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे समजते. आघाडी टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून शेवटपर्यंत प्रयत्न केले जातील, अशी माहिती आहे. आघाडी न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारीही राष्ट्रवादीने ठेवली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील पाच प्रमुख महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. तसेच मुंबई महापालिकेबाबतही लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती राज्याच्या राजकारणात मोठा गेमचेंजर ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

