(अमरावती)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. धारणी बाजारापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या राणीगाव–सुसरदा–शिवाझीरी–नारदु मार्गावर प्रवास करत असलेले पिकअप वाहन रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटून तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
आठवडी बाजारातून परतताना काळाचा घाला
राणीगावजवळील कंजोली गावातील 15 ते 20 नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतालई येथील आठवडी बाजारासाठी पिकअप वाहनाने गेले होते. बाजार आटोपून परत येत असताना सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास राणीगाव ते शिवाझीरी घाट रस्त्यावरील घोडादेव बाबा जवळील धामणनाला परिसरात हा अपघात झाला.
मृतांची ओळख
अपघातात कंजोली आणि राणीगाव येथील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बाबुलाल बुडा दहीकर, सीताराम पटेल सेलुकर, किसान ताणू धांडे, सुकराई बिसराम धांडे (सर्व राहणार कंजोली, ता. धारणी) यांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. धारणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेवर संताप
या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाझीरी घाटातील रस्ता अत्यंत नादुरुस्त असून मोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत पुढील तपास आणि पंचनामा केला आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पुन्हा एकदा निष्पापांचे बळी गेले असून, मेळघाटातील घाट रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

