(पालघर)
विरार पूर्वेकडील चंदनसार परिसरातील साईधाम अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सपना पवार या महिलेचा तिच्याच पतीने मारहाण करून खून केल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी आरोपी पती कृष्णा पवार (वय ४०) याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. बुधवारी दुपारी ४ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भांडणात आरोपी कृष्णा पवार याने पत्नी सपना पवार हिला केसांनी धरून बाथरूममध्ये ओढत नेले आणि अमानुष मारहाण केली, असा आरोप आहे. मारहाणीनंतर आरोपी दारूच्या नशेत असताना घरातच थांबून राहिला.
या घटनेची माहिती साईधाम अपार्टमेंटमधील २०४ क्रमांकाच्या खोलीत राहणारे राजेंद्र आगरे (वय ३३) यांना समजताच त्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच विरार पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, डीबी पथक आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून आरोपी पती कृष्णा पवार याला ताब्यात घेतले. गुरुवारी चौकशीनंतर त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे यांनी सांगितले की, मृत महिलेच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

