‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, नुकताच या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित झाला आहे. पाठमोऱ्या दिसणाऱ्या सासू-सुनेच्या जोडीनं “ही जोडी नेमकी कोणाची?” असा प्रश्न निर्माण केला होता आणि आता टीझरच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
टीझर आणि पोस्टरच्या अनावरणानिमित्त चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेत चित्रपटासाठी आशीर्वाद मागितले. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि निर्माते उपस्थित होते.
या चित्रपटातून प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकणार असून, प्रेक्षकांना सासू-सुनेची एक हटके, ताकदवान आणि खमंग जोडी पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये दोघींची जुगलबंदी, टोमणे, मिश्किल संवाद, भावनिक क्षण आणि नात्यांमधील गोड–तिखट समतोल यांचा सुरेख मेळ दिसून येतो. प्रार्थना बेहरे आधुनिक, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून दिसत असून, निर्मिती सावंत पारंपरिक, अनुभवसंपन्न आणि ठाम मतांच्या सासूबाईंच्या भूमिकेत लक्ष वेधून घेत आहेत.
दोन पिढ्या, दोन विचारधारा आणि दोन कणखर स्त्रियांमधील नात्याचं हलकंफुलकं पण अर्थपूर्ण चित्रण हा चित्रपटाचा गाभा आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं की, “प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते; पण एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री ठामपणे उभी राहिली, तर ती नाती किती बळकट होऊ शकतात,” हाच विचार हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “ही कथा आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या असून स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद, नोकझोक होते; पण त्याचबरोबर समजूतदारपणा आणि आपुलकीची सुंदर कहाणीही यात आहे. सासू आणि सून एकमेकींच्या आयुष्यात आधार बनू शकतात, हीच भावना या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “आमचा प्रयत्न केवळ मनोरंजन देण्याचा नसून, प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आशय मांडण्याचा आहे. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल आणि नात्यांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देईल.”
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असून, सना शिंदे आणि उमेश कुमार बन्सल हे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून, पटकथा वैशाली नाईक यांनी लिहिली आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे.
हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट १६ जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणार असून, सासू–सुनेच्या नात्याचा एक नवा, मनोरंजक आणि भावनिक पैलू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

