(ठाणे)
डोंबिवलीत झालेल्या भीषण हत्याकांडप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे. नरेंद्र उर्फ काल्या भाई भालचंद्र जाधव (वय 37) याची धारदार शस्त्रांनी तब्बल 40 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश बिराजदार (वय 29) याच्यासह अन्य दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपासानुसार, दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र जाधव याने आकाश बिराजदार याला मारहाण केली होती. त्या प्रकरणात नरेंद्रला अटक होऊन तो आधारवाडी कारागृहात होता. तीन दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. मात्र, त्या मारहाणीचा राग आकाशच्या मनात कायम होता.
शनिवारी रात्री सुमारे 11.30 वाजता नरेंद्र कोपर रेल्वे स्टेशन परिसरात आला असताना आकाश आणि नरेंद्र यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ आणि दमदाटीपासून सुरू झालेला वाद पुढे हिंसक झाला. यावेळी आकाश बिराजदार, त्याचा साथीदार दिवाकर गुप्ता (वय 18) आणि आकाशची सावत्र मुलगी आलिफा खान (वय 18) यांनी एकत्रितपणे नरेंद्रवर हल्ला चढवला.
आरोपींनी चाकू, कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर करून नरेंद्रच्या डोके, मान, गळा, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर तब्बल 40 वार केले. या गंभीर हल्ल्यात नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान भांडण सोडवण्यासाठी शुभम पांडे (वय 27) हा मध्ये पडला होता. मात्र आरोपींनी त्यालाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही शुभमने हस्तक्षेप केल्याने त्याच्या डोक्यावर चाकूने वार करण्यात आला, तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.
या गुन्ह्याच्या तपासासाठी डोंबिवलीचे पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी विशेष तपास पथक गठित केले. पोलिस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 12 तासांत अंबरनाथ आणि दिवा परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नरेंद्र जाधव आणि मुख्य आरोपी आकाश बिराजदार या दोघांवरही यापूर्वी मारहाणीचे प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

