(मुंबई)
सातारा जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (MD ड्रग्ज) कारखान्याच्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. “मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने महाराष्ट्र ‘उडता महाराष्ट्र’ बनत आहे. व्यसनाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा धंदा सुरू असून मोठी कारवाई होण्याऐवजी केवळ सारवासारव केली जात आहे,” असा आरोप त्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले,“एमडी ड्रग्ज कोणीही बनवू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणतात, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. याचा अर्थ राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. हे सहज वक्तव्य नसून सरकार अमली पदार्थांचं रॅकेट कसं चालवत आहे, हेच यातून स्पष्ट होतं. आम्ही देवेंद्र फडणवीसांना ‘नामदार’ म्हणायचं की ‘डॉन’ म्हणायचं, हा प्रश्न आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप
या प्रकरणातील पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सपकाळ म्हणाले, “४३ जणांना पकडण्यात आलं आणि ४० जणांना सोडण्यात आलं. पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की एकनाथ शिंदे यांच्या मुलानं फोन केला म्हणून ही सुटका झाली, याचं उत्तर द्या,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री राजकीय वजन वापरत असल्याचा आरोप
या प्रकरणातील विशाल मोरे, ओंकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांच्यातील संबंधांवरही त्यांनी बोट ठेवलं. “विशाल मोरेला अटक झाली, पण प्रकाश शिंदेला का सोडण्यात आलं? जिथे हा कारखाना सुरू होता, ते ठिकाण गोठा नसून अडगळीचं आणि दुर्गम ठिकाण आहे. ओंकार दिघे त्या जागेचा मालक असताना प्रकाश शिंदेला ती जागा कशी दिली? दिघेला कोणाच्या इशाऱ्यावरून सोडलं गेलं?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
सपकाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “एमडी तयार करणारी कंपनी थेट शिंदेंच्या शेतीच्या खालच्या भागात आहे. तिथे शेतीसाठी जाता की एमडी निर्मितीवर लक्ष ठेवण्यासाठी, हा प्रश्न आहे. प्रकाश शिंदेला वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री आपलं राजकीय वजन वापरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. “कधी शक्तिपीठ, कधी विकासकामं, पण आता थेट व्यसनाच्या माध्यमातून पैसे कमावले जात आहेत. तरुण पिढीला व्यसनाधीन करून महाराष्ट्राचं वाटोळं केलं जात आहे,” असा गंभीर इशारा सपकाळ यांनी दिला.
बांगलादेशी कामगारांच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत सपकाळ म्हणाले, “कारवाईचं केवळ नाटक सुरू आहे. या कारखान्यातील कामगार बांगलादेशी होता की बंगाली, याची चौकशी झाली का? दुर्गम भागात कोणी सहज पोहोचू शकत नाही. हे कामगार नगरसेवक प्रकाश शिंदे यांनीच आणले. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता असा धंदा सुरू आहे.”
निवडणूक आयोगावरही नाराजी
संतोष देशमुख हत्याकांड, महिलांबाबत आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये, पुण्यातील जमिनीचे प्रकरण यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “राजीनामे घेण्याऐवजी फक्त सारवासारव केली जात आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पुरावे दिले, वॉर्ड रचनेचे व्हिडिओ दिले, तरी कोणतीही कारवाई झाली नाही. पारदर्शक निवडणुका होणार नाहीत, हे स्पष्ट आहे.”
शेवटी सपकाळ म्हणाले, “वोट चोरीतून सत्ता मिळवली, आता ड्रग्ज विकून तो पैसा निवडणुकीसाठी वापरणार आहात का? महाराष्ट्राचं वाटोळं देवेंद्र फडणवीस करत आहेत. मुंबईला भ्रष्टाचारापासून वाचवण्याची गरज आहे,” असा कडक इशारा त्यांनी दिला.

