( लातूर )
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात कार जळीत प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या घटनेचा थरारक उलगडा केला आहे. कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असलेले गणेश चव्हाण हे जिवंत असल्याचे उघड झाले असून, १ कोटी रुपयांच्या विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अमानुष कटात लिफ्ट मागणाऱ्या निरपराध वृद्धाचा जिवंत जाळून खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री औसा–सोलापूर महामार्गालगत वानवडा शिवारात स्कोडा कंपनीची कार अचानक पेटून चार तास जळत असल्याचे अनेकांनी पहिले. स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहून तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती दिली. पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. वाहनाच्या आत एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला आणि तो औसा तांडा येथील गणेश चव्हाण असल्याचे भासवण्यात आले.
याबाबत घटनाक्रम असा की, दि. १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास डायल ११२ हेल्पलाईनवर वानवडा पाटी ते वानवडा रोडवर एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर औसा पोलीस ठाण्याच्या रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र वाहनाची तपासणी करताना गाडीत एक मानवी हाडांचा सांगाडा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
जळालेल्या वाहनाचा क्रमांक MH 43 AB 4200 असा आढळून आला. तपासात हे वाहन बळीराम गंगाधर राठोड (रा. औसा तांडा) यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट झाले. हे वाहन त्यांचा मेहुणा गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता, तो दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता “मित्राला लॅपटॉप देण्यासाठी” घरातून बाहेर पडल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले होते आणि तो अद्याप घरी परतला नव्हता.
दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या हातातील कड्याच्या आधारे जळालेला सांगाडा हा गणेश चव्हाण याचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. ओळख पटवण्याच्या अटीवर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलिसांना मोठा संशय निर्माण झाला. गणेश चव्हाण जिवंत असल्याची माहिती त्याच्या एका मैत्रिणीच्या चौकशीतून पुढे आली.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाने गणेश चव्हाण याचा पाठलाग करत त्याला विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली.
विम्याच्या पैशासाठी थरारक कट
गणेश चव्हाण याने कबूल केले की, तो मागील एक ते दीड वर्षांपासून आर्थिक अडचणीत होता. त्याच्यावर सुमारे ५७ लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच त्याने मागील तीन वर्षांपासून एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढलेला होता. कर्ज फेडण्यासाठी आणि कुटुंबाला विम्याची रक्कम मिळावी, यासाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा कट त्याने आखला.
दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता तो घरातून बाहेर पडला. औसा-याकतपूर रोड चौकात गोविंद किशन यादव (वय ५०, रा. पाटील गल्ली, औसा) या वृद्धाने लिफ्ट मागितली. गणेश चव्हाण याने त्याला गाडीत बसवले. यादव पूर्णपणे दारूच्या नशेत होता. औसा किल्ल्याजवळ सोडण्यास सांगितल्यानंतर, गणेशच्या मनात त्याचा खून करून स्वतःचा मृत्यू दाखवण्याचा विचार पक्का झाला.
गणेशने ढाब्यावरून चिकन आणले. यादवने थोडे खाल्ल्यानंतर गाडीत झोप घेतली. याच संधीचा फायदा घेत गणेशने यादवला ड्रायव्हर सीटवर ओढून बसवले, सीट बेल्ट लावला आणि गाडीत काड्यापेट्या, प्लास्टिक पिशव्या ठेवून आग लावली. आग लवकर लागावी म्हणून पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून तो पळून गेला. यानंतर तो पायी तुळजापूर मोड येथे गेला, तेथून शर्मा ट्रॅव्हल्सने कोल्हापूर आणि पुढे एसटीने विजयदुर्ग येथे पोहोचला.
घटनेच्या स्वरूपावरून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान कॉल डिटेल्स, हालचाली आणि तांत्रिक पुरावे तपासले असता धक्कादायक सत्य समोर आले. मृत घोषित केलेला गणेश चव्हाण हा जिवंत असून, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लातूर पोलिसांनी त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकारानंतर औसा पोलीस ठाण्यात गणेश गोपीनाथ चव्हाण याच्याविरोधात खून करून पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मृत्यू तपास अधिकारी पोउपनि डाके यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
गंभीर गुन्हे दाखल
या घटनेत एका निरपराध वृद्धाचा बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी गणेश चव्हाणविरुद्ध खून, फसवणूक आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

