(रत्नागिरी/प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथील कुणबीवाडी परिसरात सोमवारी मध्यरात्री दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य एक युवक जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात पंकज विश्वास यादव (वय ३५, रा. चवे बौद्धवाडी, रत्नागिरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला प्रथमेश प्रकाश पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यादव हे सोमवारी सायंकाळी त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८ बीजे १२७५) घेऊन खंडाळा येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीवर प्रथमेश पवार हा मागे बसलेला होता. खंडाळा येथील काम आटोपून दोघेही देवूड मार्गे चवेच्या दिशेने परत येत असताना आगरनरळ कुणबीवाडी बसथांब्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले आणि गंभीर अपघात झाला.
या अपघातात पंकज यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर प्रथमेश पवार हेदेखील जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास पंकज यादव यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मित्रपरिवाराकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली
दुचाकी अपघातात पंकज यादव यांचा झालेला आकस्मिक मृत्यू मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांसाठी मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी सामाजिक माध्यमांवर स्टेट्स ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंकज यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून, “अकाली निघून गेलास मित्रा”, “तुझी उणीव कायम जाणवत राहील” अशा भावनिक शब्दांत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी त्यांच्या छायाचित्रांसह स्मरणरंजन करणारे संदेश शेअर करत आठवणींना उजाळा दिला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे चवे परिसरातही दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

