(मुंबई)
महाराष्ट्रात दरवर्षी दसऱ्याचा मेळावा फक्त सणाचा सोहळा नसून, राजकारणाला कलाटणी देणारा मंच म्हणून ओळखला जातो. या दिवशी विविध पक्ष आणि नेते राज्यातील राजकीय रणनीती ठरवतात.
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा:
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. हा मेळावा अनेक अर्थांनी विशेष ठरण्याची शक्यता आहे, कारण या मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें युतीची घोषणा करू शकतात, असे संकेत आहेत.
एकनाथ शिंदे यांचा मेळावा:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी हा मेळावा आयोजित केला जाणार असून, रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान ते उपस्थितांना संबोधित करतील.
मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा:
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर होणार आहे. ३५० एकरात तयारी सुरू असून, पार्किंगसह एकूण ९०० एकर जमीन मेळाव्यासाठी सज्ज केली जात आहे.
पंकजा मुंडे यांचा मेळावा:
भाजपाच्या नेत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर होणार आहे. या सोहळ्यासाठी हेलिपॅड तयार केला असून, पंकजा मुंडे सकाळी ११:१५ वाजता ध्यान मंदिरात पूजा करतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा:
नागपुरात दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शस्त्रपूजन आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन:
दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपुर येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता असूनही, प्रशासनाने शाळा, कॉलेज आणि समाजभवनांचा वापर करून लाखो अनुयायांची व्यवस्था केली आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या मेळाव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक संघटना आणि सांस्कृतिक उत्सवांचा एकत्रित संगम दिसून येतो. यंदाही हा सोहळा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

