(रत्नागिरी)
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या छाननीत लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये कोकणातील तिन्ही जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील छाननीत 7 हजार 753 महिला अपात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यात या योजनेकरिता 4 लाख 12 हजार 774 इतक्या लाभार्थी महिला पात्र ठरल्या होत्या. पण आता यातील जवळपास 8 हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे सरकारचे 1 कोटी 16 लाख रुपयांची बचत होणार आहे.
या योजनेत अनेक अटी होत्या. त्यांचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनेचा लाभ घेतला अशा एक-दोन नव्हे, तर ७ हजार ७५३ लाडक्या बहिणी जिल्ह्यात आढळल्या. त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काही बहिणी अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनाही वगळले. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेणाऱ्या २ हजार ७६२ महिला आढळल्या. चारचाकी असलेल्या १ हजार ३५० बहिणी आढळल्या.
६५ वर्षांवरील १ हजार ३८७ बहिणी लाभ घेताना आढळल्या. अनेक नव्या शेतकरी योजनांच्या लाभार्थी २ हजार २५४ लाभार्थी महिला आढळल्या. एकूण जिल्ह्यात ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना आता लाभ मिळणार नाही. उर्वरित बहिणींना आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल. ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत हे कार्ड लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.