( मुंबई )
मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता असून, त्यासाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता असून, अवघ्या एक महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची चर्चा आहे. अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी (तेजस्विनी) घोसाळकर यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला असून, त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, आज १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर येथील भाजप पक्ष कार्यालयात त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जातात. उत्तर मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला हादरवणारे घोसाळकर हे नाव शिवसेना-ठाकरेंसाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत दहिसर विधानसभा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मुंबई बँकेच्या संचालकपदी भाजपच्या पाठिंब्याने त्यांची नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
विशेष म्हणजे, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभर रिक्त असलेले मुंबई बँकेचे संचालकपद ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भरले गेले आणि त्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधिक तीव्र झाली होती.
दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप त्यांचे सासरे व शिवसेना (ठाकरे गट) उपनेते विनोद घोसाळकर यांनी यापूर्वी केला होता. तसेच, तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “सहकारात राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून काम करणे हाच खरा सहकार धर्म आहे. त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणे चुकीचे ठरेल,” असे सूचक विधान केले होते.
मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्तीनंतर भाजप प्रवेशाच्या चर्चांवर विनोद घोसाळकर यांनी सुरुवातीला स्पष्टीकरण देत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. तसेच, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता आणि “काहीही झाले तरी आपण ठाकरे यांच्यासोबतच राहू,” असे स्पष्ट केले होते.
आता मात्र तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याने, विनोद घोसाळकर पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

