(पुणे)
विधिमंडळ अधिवेशनात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली. रात्री आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी दिसत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी–चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, घरात एकटी असलेल्या चिमुकलीचा फायदा घेत समीर कुमार मंडळ (वय ३५ वर्षे) या आरोपीने तिला घराजवळील परिसरात नेले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याची कबुली तपासात समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी विवाहित असून, तो काही दिवसांपासून मुलीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून त्याने हत्या केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. रविवारी सकाळी झालेल्या चौकशीत संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. या अमानुष घटनेमुळे मावळ परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, राज्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. गेल्या १० महिन्यांत १,१८७ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले असून, केवळ ऑक्टोबर महिन्यातच १३६ प्रकरणांची नोंद झाली आहे. राजधानी मुंबईतही मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, दाखल झालेल्या १,१८७ प्रकरणांपैकी १,११८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

