(रत्नागिरी)
मेहनत, सातत्य आणि ज्ञानाची आस असल्यास यश आपोआप पायाशी येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स आयोजित ‘स्कॉलर सर्च 2025’ या जिल्हास्तरीय परीक्षेत शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथील विद्यार्थिनी वेदांतिका बापूसाहेब पवार हिने प्रथम क्रमांक मिळवत ‘स्कॉलर’ होण्याचा मान मिळवला.
या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली असून स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, विचारशक्ती विकसित व्हावी आणि आत्मविश्वास बळकट व्हावा, या उद्देशाने नवनिर्माण महाविद्यालय दरवर्षी ही परीक्षा आयोजित करते.

परीक्षेचा स्वरूप व सहभाग:
परीक्षा भाषा, विज्ञान, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली गेली. यंदा ही परीक्षा आठव्या वर्षात प्रवेशली, ज्यात लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील 32 शाळांमधील सुमारे 1,500 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून 116 विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, ज्यात आठ विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता सिद्ध केली.
अंतिम निकाल व बक्षीस:
- प्रथम क्रमांक: वेदांतिका पवार (शिर्के हायस्कूल) – रु. 3,000 रोख बक्षीस व प्रशस्तीपत्रक
- द्वितीय क्रमांक: आशय नंदकुमार पाटील (नाथ पै हायस्कूल, हरचे) – रु. 2,000 रोख बक्षीस व प्रशस्तीपत्रक
- तृतीय क्रमांक: श्रावणी दिनेश वाडेकर व आर्यन विनोद गुरव (पटवर्धन हायस्कूल)
अन्य विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी: वाहतूक नियंत्रक पोलिस निरीक्षक अश्वनाथ बाप्पाची खेडकर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख: सुकुमार शिंदे, संस्थेच्या संचालिका: सीमा हेगशेट्ये, प्रास्ताविक: प्रा. सचिन टेकाळे, सूत्रसंचालन: प्रा. निकिता नलावडे आभार प्रदर्शन: प्रा. रोहित यादव यांनी उपस्थिती लावली.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला नवी दिशा देणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी ‘स्कॉलर सर्च परीक्षा’ अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अभ्यास हाच खरा यशाचा मार्ग आह, असा संदेश यामधून मिळत आहे.

