(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील झाडगाव परिसरात योजक कंपनीजवळ रस्त्यावर रिक्षा अडवून चालकाला लोखंडी फायटर आणि हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी घडली. या हल्ल्यात शेखर चंद्रकांत भोंगले (वय ५०, रा. मुखगवाडा, रत्नागिरी) हे जखमी झाले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, शेखर भोगले हे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक एमएच ०८ ए क्यू ५९८८) घेऊन पांढरा समुद्र नाका येथून खालची आळी, झाडगावच्या दिशेने जात होते. योजक कंपनीजवळ मुख्य रस्त्यावर आले असता, त्यांच्या वाडीत राहणाऱ्या राहुल राजेंद्र पिलणकर याने दुचाकी (क्रमांक एमएच ०८/९०९९) रिक्षासमोर आडवी उभी करून त्यांचा मार्ग अडविला. त्यानंतर ‘तू माझी इज्जत काढतोस का?’ असे म्हणत त्याने भोंगले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर स्वेजस राजेश पिलणकर आणि राहुल राजेंद्र पिलणकर या दोघांनी भोगले यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी स्वेजस याने हातातील लोखंडी फायटरने भोगले यांच्या उजव्या डोळ्यावरील भुवईजवळ आणि पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. तर राहुल याने कानाजवळ आणि तोंडावर हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी स्वेजस राजेश पिलणकर (वय २६) आणि राहुल राजेंद्र पिलणकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.


