(लांजा / वार्ताहर)
हर्दखळे ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची आता सखोल चौकशी होणार आहे. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करून चौकशीची तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता हर्दखळे ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.
सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये संबंधित कामांवर झालेला खर्च, आर्थिक व्यवहार, उपलब्ध कागदपत्रे, ग्रामसभेच्या मंजुरीची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात झालेल्या कामांची पाहणी यांचा समावेश असेल.
याशिवाय, जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांवरील खर्च, कामांची अंमलबजावणी आणि त्यासंबंधीच्या नोंदींचीही तपासणी केली जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्याबरोबरच आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का आणि संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत का, याचीही चौकशी केली जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे संबंधित पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संबंधित कागदपत्रे, नोंदी आणि प्रत्यक्ष कामांच्या स्थितीची पडताळणी करून तक्रारींच्या अनुषंगाने तपासणी केली जाणार आहे.
या चौकशीमुळे हर्दखळे ग्रामपंचायतीतील मागील काही वर्षांतील विकासकामे आणि आर्थिक व्यवहार अधिकृत तपासणीच्या कक्षेत आले आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळते का, विकासकामे नियमानुसार झाली आहेत का आणि आर्थिक व्यवहारांमध्ये काही अनियमितता आहे का, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.
चौकशी केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामांची पाहणी करावी, संबंधित नोंदींची सखोल तपासणी करावी आणि अनियमितता आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चौकशीत नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात, संबंधितांची जबाबदारी निश्चित होते का आणि काही अनियमितता आढळल्यास पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


